Bloodbath on Dalal Street Sensex Crash: शेअर बाजारामध्ये आज फार मोठी पडझड झाली. शेअर बाजारातील कारभार आज घसरणीसहीत सुरु झाला. मागील व्यापारी सत्रामध्येही बाजार गडगडला होता. आज सेन्सेक्स 755.28 अंकांनी म्हणजेच 1.03 टक्क्यांहून अधिक गडगडून 72 हजार 373.49 अंकांवर उघडला. तर निफ्टी 203.50 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी पडून 21,828.80 अंकावर उघडला. सकाळी 10.40 वाजता सेन्सेक्स 1014 अंकांनी खाली म्हणजेच 72 हजार 114 अंकांवर तर निफ्टी 287 अंकांनी घसरून 287 वर ट्रेड करत होता. बीएसईवर लिस्टेटड कंपन्यांचे मूल्य 1.91 लाख कोटींनी पडून 373.04 लाख कोटींवर आले आहे.
निफ्टी इंडेक्सवर भारती एअरटेल, एचडीएफसी लाइफ, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आईटीसीच्या शेअर्समध्ये वाढ दिसत आहे. तर एचडीएफसी बँक, हिंडाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अॅक्सेस बँक आणि बजाज ऑटोचे शेअर्स गडगडले आहेत. एचडीएफसी बँकची सर्वात जास्त पडझड झाली आहे. 6.5 टक्क्यांनी एचडीएफसीच्या शेअर्सची किंमत पडली. कंपनीचा वार्षिक नफा 34 टक्क्यांपर्यंत असून 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमधील निव्वळ नफा 16,372.54 कोटी इतका आहे. शेअर बाजारामध्ये बँकिंग सेक्टरमधील इतर शेअर्सही गडगडले आहेत. अॅक्सेस बँक, आयसीसी बँक, कोटक बँक, एसबीआय़ आणि इंडसइंडिया बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरलेत. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनॅनशिएलची 2 टक्क्यांनी पडझड झाली आहे. निफ्टी मेटल, रिअॅलिटी, ऑटो मिडिया आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्सची पडझड ही 0.3 टक्के ते 1.8 टक्क्यांपर्यंत आहे.
बुधवारी आशियामधील सर्वच शेअर बाजारांमध्ये पडझड दिसून आली आहे. जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेला चिनी शेअर मार्केट सावरण्याचा प्रयत्न करत आहे. चौथ्या तिमाहीमध्ये चिनी अर्थव्यवस्थेमध्ये 5.2 टक्क्यांनी वाढ होईल अशी माहिती समोर आल्यानंतर चिनी शेअर बाजार कमालीचा पडला. चीनमधील ब्ल्यू चीप स्टॉक इंडेक्स हा 1 टक्क्याहून अधिक पडला. 2019 नंतर चिनी शेअरबाजार त्यांच्या सर्वात किमान पातळीच्या जवळपास पोहोचला आहे. हाँग काँगचा हेंग शेंग इंडेक्सही 2.5 टक्क्यांनी पडला आहे.
शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात झालेल्या 250 पॉइण्ट्सच्या पडझडीमध्ये केवळ एचडीएफसी बँकेचा वाटा 167 अंकांचा आहे. सकाळच्या सत्रातील पडझडीमागील हेच मुख्य कारण आहे. एचडीएफसीचे शेअर्स जवळपास 7 टक्क्यांपर्यंत पडून दिवसभरातील किमान स्तरावर म्हणजे 1,560 रुपयांपर्यंत घसरलेत. 34 टक्के निव्वळ नफा मिळवणाऱ्या या बँकेत गुंतवणूकदार रस दाखवत नाही.