Devendra Fadnavis On Ajit Pawar And Sharad Pawar: राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून 2019 साली 3 दिवसांसाठी सत्तेत आलेलं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांचं (Ajit Pawar) पहाटेचं सरकार पुन्हा चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक विधान करताना यासंदर्भात आपल्याला पूर्वकल्पना होती असं म्हटलं आहे. या सरकारमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असं पवार म्हणाले. तर याचवरुन विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारसाहेब राष्ट्रपती राजवट उठवण्यासंदर्भात बोलत असेल तरी ती लागू करण्यासाठी काय काय करण्यात आलं याबद्दलही विचारावं असं प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं. आज 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी फडणवीस यांना याच विषयासंदर्भात विचारणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना क्लिन चीट दिल्याचं मात्र त्याचवेळी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोर जाण्याचा निर्णय घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला. याच विषयावरुन फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर निलेश खरे यांनी याच मुद्द्यावर, "त्यांनी ज्यावेळेला निर्णय घेतला तेव्हा तुम्ही पण राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता," असं म्हणत पहाटेच्या सरकारसंदर्भात सध्या असलेल्या चर्चेवरुन प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी आमची त्यावेळी राष्ट्रवादीबरोबरच चर्चा झाली होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने भूमिका बदलली असं सांगतानाच अजित पवार मात्र प्रामाणिकपणे आमच्याकडे आले होते, असं म्हटलं.
"मी स्पष्ट सांगितलं आहे की, राजकारणात जेव्हा तुमच्याशी धोका होतो, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा जिवंत रहावं लागतं. त्यावेळी तुम्हाला राजकारणात रिलेव्हंट रहावं लागतं. आमच्या लक्षात आलं की त्यांनी धोका दिला आहे. तेव्हाच आम्हाला राष्ट्रवादीकडून काही इशारे मिळत होते. ते इशारे मिळत होते म्हणून त्यांच्याशी चर्चा सुरु केली. त्यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात नेली. मात्र त्यांनी निर्णय बदलला आणि काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे," असं फडणवीस म्हणाले.
"मी पुन्हा सांगतो काही वाक्य मी बोललो, ते ही माध्यमांना योग्यप्रकारे इंटरप्रिट करता आली नाही. काही वाक्य पवारसाहेब बोलले ते ही तुम्हाला इंटरप्रिट करता आली नाही. मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की आमची चर्चा राष्ट्रवादीबरोबरच झाली होती. अजित पवार आमच्याकडे हे प्रामाणिकपणे आले होते. ते आम्हाला फसवण्यासाठी आले नव्हते. पण राष्ट्रवादीने स्ट्रॅटर्जी बदलली. पण त्यामुळे ते सरकार टीकलं नाही," असं फडणवीस म्हणाले. "तो निर्णय आम्ही आमची फसवणूक झाल्याने घेतला होता. पण पुन्हा एकदा तीच परिस्थिती आली. फरक एवढाच की उद्धवजींनी केली ती फसवणूक मोठी होती. कारण ते आमचे मित्र होते. एकत्र लढले होते," असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
"प्रत्येक कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार त्यांच्यासमोर (उद्धव ठाकरेंसमोर) उल्लेख झाला. त्यांनी स्वत: उल्लेख केला. त्यांनी स्वत: घोषणा दिल्या त्यानंतर ते असं वागले. राष्ट्रवादीने केलं ते चुकीचं होतं. पण ते वैचारिक विरोधक होते. विरोधात लढले होते. त्याचा त्रास मला कमी आहे. याचा त्रास अधिक आहे की जो सोबत राहून पाठीत खंजीर खुपसतो त्याचा त्रास अधिक आहे," असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
तसेच शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट आपल्या या राजकीय खेळीमुळे उठल्याच्या विधानावरही फडणवीसांनी भाष्य केलं. पवारसाहेबांनी त्यांच्यामुळे राष्ट्रपती राजवट उठल्याचं सांगितलं असलं तरी ती लावण्यासाठी काय काय केलं हे ही प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारावं, असं फडणवीस म्हणाले.