मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार

भाजपा मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. 

Updated: Jan 21, 2020, 10:07 PM IST
मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार  title=

मुंबई : भाजपा मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. भाजपाने महापालिकेतली भूमिका बदलली आहे. भाजपाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला मुंबईतील भाजपचे नगरसेवक, मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. सध्या मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात आहे आणि काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे.

भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत 

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये पाचच जागांचा फरक होता. पण त्यावेळी शिवसेनेला सत्ता स्थापू देणार आणि विरोध करणार नाही, भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहील, अशी भाजपची भूमिका होती. आता मात्र भाजपने आता शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी कंबर कसली आहे.

थोडक्यात शिवसेनेसाठी सोन्याची कोंबडी ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सर्व प्रकारे कोंडी आता भाजप करणार आहे. यापुढे भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आणखी प्रखरतेने बघायला मिळणार आहे.

२०१७ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. या निवडणुकीत शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. फक्त २ जागांचा फरक असतानाही भाजपने सत्ता स्थापनेच्या हालचाली केल्या नव्हत्या. तसंच विरोधी पक्षात न बसता आपण मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावू, असं सांगत भाजपने शिवसेनेचा रस्ता मोकळा केला होता.

मुंबई महापालिका निवडणूक निकालाच्या ६ महिन्यांच्या आतच मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे अपक्षांसह एकूण ९४ नगरसेवक आहेत. तर भाजपचे ८३, काँग्रेसचे २९ आणि राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक आहेत.

मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. रवी राजा हे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबईच्या महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी तसंच भाजपने उमेदवार दिला नाही, त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली.