मुंबई : सत्तेतर राहुनही एकमेकांवर लाथाळ्यांची मुक्त उधळण करणाऱ्या युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून (सोमवार, २६ फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. राज्यातील विविध प्रश्न, आक्रमक झालेले विरोधक आणि अधिवेशनाआधीच सरकारची झालेली कोंडी, आदी गोष्टींमुळे यंदाचे अधिवेशन नेहमीप्रमाणेच वादळी होईल असे संकेत आहेत.
दरम्यान, सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे. शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कोरेगांव -भीमा प्रकरण, बोण्डअळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळणे, शेतकरी कर्जमाफीचा गोंधळ, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा, त्यातच अपमानजनक पद्धतीने करण्यात आलेले शेतकऱ्यांचे पंचनामे, या मुळे सरकार आगोदरच कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. आता या कोंडीचा राज्याच्या हितासाठी विरोधक कसा वापर करून घेतात याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.
दरम्यान, भाजप-सेना सरकारचे हे चौथे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विद्यमान राज्य सरकारचा हा शेवटून दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कारण, पुढच्या वर्षी राज्यात विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकाही लागत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या रूपात राज्य सरकार काय काय घोषणा करते याबाबतही उत्सुकता आहे.