मुंबई : एकीकडे महाजानेदश यात्रेच्या माध्यमातून पक्षाची हवा राज्यात तयार करण्याचा प्रयत्न भाजपचा असतांना आज भाजपने प्रचार समितीची बैठक मुंबईत बोलवली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश संघटनमंत्री यांच्यासह प्रचार समितीमधील २० पेक्षा जास्त सदस्य सहभागी होणार आहेत. प्रचाराची रणनिती ठरवण्याबाबात चर्चा केली जाणार असून पक्षाच्या निवडणुक तयारीचा आढावाही घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला. महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने त्यांनी राज्यात हा दौरा सुरु केला. मात्र, कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने हा दौरा थांबविण्यात आला.
दरम्यान, राज्यव्यापी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठकीचा सपाटा सुरू होता. सुरुवातीला कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर राज्यसभा खासदार आणि विधान परिषद आमदारांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रचार समितीची बैठक होणार आहे.
आजच्या या बैठकीत संघटनेबाबत नवीन धैय धोरणे, नव्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय बनविणे, जनतेपर्यंत पक्षाचे कार्य पोहोचविणे आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपसातले मतभेत मिटवून नव्याने पक्षकार्य पुढे नेणे याबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेतले जातील.