मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency Bye Election) भाजपाकडून मुरजी पटेल (Bjp Murji Patel) यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपची मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं निधन झाल्यानं मतदारसंघ रिक्त आहे. (bjp nominates murji patel for bye election 2022 from andheri east assembly constituency source information)
रमेश लटके याचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हापासून मतदारसंघ रिक्त आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुरजी यांच्याशी संपर्क साधून मतदारसंघाचा आढावा घेतला होता. तेव्हाही मुरजी यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. आता भाजपच्या बैठकीत मुरजी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
तर भाजपकडून आमदार आशिष शेलार यांच्यावर या मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. पटेल 2019 मध्ये रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती.
पटेल 'जीवन ज्योत प्रतिष्ठाण' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे. त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे.
साधारणपणे कोणत्याही लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांमधील कोणालाही उमेदवारी दिले जाते. तसेच या अशा निवडणुका या बिनविरोध करुन मृत लोकप्रतिनिधीबाबत सहानभूती दाखवण्याती राज्याची परंपरा राहिती आहे.
मात्र शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप तरी स्पष्ट नाही. तर भाजपने दंड थोपटल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.