Rahul Gandhi : बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान ताज असतानाच आता भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Sukhdeorao Bonde) यांनी देखील राहुल गांधी यांच्या यासंदर्भात एक वादग्रस्त केलं आहे. राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं खासदार अनिल बोंडे म्हणालेत. तर बोंडेंचं मानसिक संतूलन बिघडलंय असा टोला काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडेंना लगावलाय. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीत काँग्रेस आक्रमक झालीय.
काय म्हणाले अनिल बोंडे
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. पण राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे, अशी टिका अनिल बोंडे यांनी केली आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली आहे. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून 'जीभ छाटू नये तर जिभेला चटके' मात्र निश्चितच दिले पाहिजे असं खासदार बोंडे यांनी म्हटलंय.
बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक
खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेसने केलीय. जोपर्यंत गुन्हा दाखल करुन अटक करतर नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. तर अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांच्या विधानाचं भाजप समर्थन करत नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत....
दिल्लीत तक्रार दाखल
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केलीय. राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतील तुघलक रोड पोलिसात तक्रार दिलीय. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू आणि तरविंदर मारवाह यांच्यासह संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पोलिसात तक्रार दिलीय..
एकीकडे भाजप आणि शिवसेना नेत्यांनी राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करून टीका केलीय तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका करतांना काँग्रेस नेत्याचीही जीभ घसरलीय. राहुल गांधींवर टीका करणाऱ्या नेत्यांना मारलं पाहिजे असं काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे म्हणालेत.. मुंबईत त्यांनी राहुल गांधींवर टीका कऱणाऱ्या सत्ताधारी नेत्यांचा आंदोलन करून निषेध केलाय.
काँग्रेस अध्यक्षांचं मोदींना पत्र
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलंय. यावेळी त्यांनी मोदींना त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात द्वेषपूर्ण भाषेवर चिंताही व्यक्त केलीय . राहुल गांधींना भाजपचे नेते सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचं खरगेंनी मोदींना सांगितलं. भविष्यासाठी हे घातक आहे. अशा नेत्यांवर अंकुश ठेवा आणि त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी खरगे यांनी केली.