विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नागपूरात पहिलेच अधिवेशन पार पडत आहे.

Updated: Dec 16, 2019, 11:14 AM IST
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर title=

मुंबई: भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नागपूरात पहिलेच अधिवेशन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत भाजपचा आवाज कोण बुलंद करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता भाजपने ही जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्यावर सोपविली आहे. 

आजपासून नागपूरात सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. यावेळी शिवस्मारक, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सावरकरांचा मुद्द्यावरून भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र, अखेरच्या क्षणी प्रवीण दरेकर यांनी या शर्यतीत बाजी मारली. गेल्या टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. त्यांनी वेळोवेळी सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे आता प्रवीण दरेकर यांनी ही कामगिरी कितपत जमणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीची सुरूवात करणारे प्रवीण दरेकर काही काळ मनसेत होते. सहकार क्षेत्रातही त्यांचे चांगले वर्चस्व आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांना तिकीट मिळाले नव्हते.