डोंबिवली: सध्या देशात गांधी विरुद्ध सावरकर असा वाद निर्माण केला जातोय, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. त्या रविवारी डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, देशातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी देशात गांधी विरुद्ध सावरकर असा वादही निर्माण केला जातोय. मात्र, खरा प्रश्न गांधीवादी अर्थव्यवस्था की मोदीवादी अर्थव्यवस्था, हाच असल्याचे मेधा पाटकर यांनी म्हटले.
कॅबमुळे देशभरात संघर्षाचे वातावरण- शरद पवार
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावरही टीका केली. देशाला बुलेट ट्रेनची खरोखर किती आणि का गरज आहे का, हा प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याच्या उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाचे त्यांनी कौतुकही केले.
याशिवाय, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावरही मेधा पाटकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा हिंसक प्रतिकार आम्ही करू शकतो. मात्र, तसे झाले तर समाजच शिल्लक राहणार नाही. अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने कसा विरोध करता येईल, हे शिकायला पाहिजे, असेही मेधा पाटकर यांनी सांगितले.