फडणवीसांचा 'तो' एक सल्ला अन् निलेश राणेंची निवृत्ती मागे! रवींद्र चव्हाणांबरोबरच बैठकीत नक्की घडलं काय?

भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या बैठकीत निलेश राणे यांची मनधरणी करण्यात अखेर यश आलं आहे. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेततला. 

राजीव कासले | Updated: Oct 25, 2023, 01:52 PM IST
फडणवीसांचा 'तो' एक सल्ला अन् निलेश राणेंची निवृत्ती मागे! रवींद्र चव्हाणांबरोबरच बैठकीत नक्की घडलं काय? title=

Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. ती आता त्यांनी मागे घेतली आहे. नाराज असलेल्या निलेश राणेंची अखेर मनधरणी करण्यात यश आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) मध्यस्थीनंतर निलेश राणेंची (Nilesh Rane) नाराजी दूर झालीय. स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा राणेंनी केली होती.  मंत्री रवीद्र चव्हाण यांनी त्यांची आज भेट घेतली. त्यानंतर राणेंची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांनी केले. यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. सिंधुदुर्गात राणेंच्या नेतृत्वात झंझावात सुरू राहणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाणांनी दिलीय.

बैठकीत नेमकं काय घडलं?
निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी मीडियाशी संवाद साधला. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचं ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नाही, आम्ही याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा झाली. संघटनेत काम करताना छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून निलेश राणे यांनी ही भूमिका घेतली. या गोष्टीचा आम्ही गांभीर्याने विचार केला. मी, फडवणीस याता यात गोष्टीत लक्ष घालू असं चव्हाण यांनी सांगितलं.

एक कार्यकर्ता पक्षातून बाहेर जाणं पक्षासाठी योग्य नाही, म्हणून आणि त्यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. आमच्या विनंतीला मान देत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे निलेश राणे यांचा झंझावात कोकणात असाच दिसेल, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांचा आदेश 
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यानी आदेश दिल्यानंतर निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. निवृत्तीच्या तोंडावर पक्षात कलह नको, एकत्रित पणे निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. 

निलेश राणे यांचं आधीचं ट्विट

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. 

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.