महाराष्ट्रात सुपारी किलर्सचं सरकार, दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे

Updated: Sep 8, 2021, 05:29 PM IST
महाराष्ट्रात सुपारी किलर्सचं सरकार, दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन title=

मुंबई : तुम्ही कितीही मोठे गुंड आणलात, अगदी दाऊद इब्राहिमला आणलं तरीही आपण घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणारच असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी थेट ठाकरे सरकारलाच खुलं आव्हान दिलं आहे.

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाण्यात अनेक गौप्यस्फोट केले. शिवसेनेचे (shivsena) लोक मला गोळ्या घालण्याच्या धमक्या देत असून त्यावर मुंबई पोलीस (Mumbai Police) काहीच कारवाई करत नाहीत असा थेट आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या विहंग गार्डनच्या 114 फ्लॅटला OC मिळाली नाही, स्वतः भूषण गगराणी यांनी हे सगळे अनधिकृत बांधकाम असून त्याला अधिकृत करता येणार नाही असं म्हटलं, त्यामुळे प्रताप सरनाईक यांची सर्व मालमत्ता विकून ठाणे महानगरपालिकेने थकबाकी वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली. 

आपण ज्या बारा मंत्र्यांची नावे दिले आहेत ते सर्व गुन्हेगार असून शरद पवार त्यांना पाठीशी घालत आहेत तर भावना गवळी त्यांच्या बाबतीत मोठा खुलासा आपण पुण्यातील पत्रकार परिषदेत उद्या करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. 

सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा

किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची मोहिम सुरु केल्यानं आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. याबाबत सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.

मनसूख हिरेन यांच्या कुटुंबियांना न्याय 

ठाण्यातील व्यापारी मनसूख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेऊन धीर दिला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांची असल्याचं कळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मनसुख हिरेन यांचं मृतदेह मुंब्रा इथल्या खाडीत सापडला होता. याप्रकरणी तपास यंत्रणांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केल्याने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे भ्रष्ट सरकार असून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सचिन वाझे आणि इतरांना याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरही आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील आणि मनसूख हिरेन यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.