Ganesh Chaturthi 2021 : कोरोना निर्बंधामुळं मागील वर्षी आरोग्योत्सव साजरा करणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं यंदा मात्र गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी नियमांनुसार लालबागचा राजाची मूर्ती यंदा ४ फूट इतक्याच उंचीची असणार आहे.
पारंपरिक मूर्तीप्रमाणं यंदा मूर्तीची उंची जास्त नसल्यामुळं देवाचे नियमित वापरात येणारे दागिने या वर्षी वापरता येणार नाहीत. यामुळं यावेळी बाप्पासाठी यंदा नवे दागिने बनवण्यात आले आहेत. त्यामुळं Ganesh Chaturthi 2021 दरम्यान, लालबागच्या राजाचा नवा थाट भाविकांना पाहता येणार आहे. नव्या दागिन्यांमध्ये 2 किलो 31 ग्रॅम वजनाचे चांदीचे एकूण 13 दागिने तयार करण्यात आले आहेत ज्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. या दागिन्यांमध्ये गळ्यातले श्रीमंत हार, 2 परशू कडे, 4 बाजू बंद, 2 कडे, 1 भिक बाळी, 1 अंगठी, सोंड पट्टा अशा अलंकारांचा समावेश आहे.
कोरोनाचं संकट आणि प्रशासनाची नियमावली पाहया सध्या भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आले. याबरोबरच भक्तांना ऑनलाईन देणगीही देता येणार आहे. इतकंच नव्हे तर राजाचा प्रसादही मिळणार आहे. महामारीच्या संकटामुळं उत्सवाचं रुप आवरतं घेण्यात येत असलं तरीही मनात असणाऱी श्रद्धा मात्र तसूभरही कमी झालेली नाही, अशीच भावना असंख्य भक्तगणांनी व्यक्त केली आहे.