मुंबई: भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे शनिवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगरपालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. सरदार तारा सिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग अनेक वर्ष प्रतिनिधित्त्व केले होते. मुलूंड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
My senior colleague, BJP leader Sardar Tarasing, after prolonged illnesses died at Lilavati Hospital today morning, Ishwar un ki Atma ko Shanti De Prarthana @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 19, 2020
२०१८ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. गेल्यावर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.