राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध! भाजपच्या संजय उपाध्याय यांची माघार

महाराष्ट्राच्या परंपरेनुसार पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

Updated: Sep 27, 2021, 03:28 PM IST
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध! भाजपच्या संजय उपाध्याय यांची माघार title=

मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी काँग्रेसकडून (Congress) रजनी पाटील (Rajni Patil) तर भाजपकडून (BJP) संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. अखेर आघाडीच्या प्रयत्नांना यश आलं आहे. काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपने माघार घेतली असून राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघारी घ्यावी असं आवाहन केलं होतं. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे केली.

काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करुन चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याननंतर काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचं चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केलं.