शिवसेनेला टाळत आरक्षणाच्या मुद्यावर भाजपची रात्री उशिरा मॅरेथॉन बैठक

 तीन तासांपेक्षा जास्त वेळ मॅरेथॉन बैठक घेत चर्चा

Updated: Jul 27, 2018, 09:43 AM IST
शिवसेनेला टाळत आरक्षणाच्या मुद्यावर भाजपची रात्री उशिरा मॅरेथॉन बैठक   title=

मुंबई : मराठा आरक्षणबाबत थेट मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचा विषय छेडणाऱ्या सत्तेतल्या शिवसेनेला खड्यासारखे बाजूला ठेवत पक्षाची स्वतंत्र बैठक घेत भाजपाने आरक्षण मुद्यावरची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यासह भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत विनोद तावडे यांच्या निवासस्थानी तीन तासांपेक्षा जास्त वेळ मॅरेथॉन बैठक घेत चर्चा केली. 

उद्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक 

मराठा आरक्षण मुद्द्यावरून शनिवारी मुख्यमंत्री यांनी विधिमंडळच्या दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांच्या गट नेत्यांची बैठक मुंबईत विधीमंडळमध्ये बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत मराठा आरक्षण विषयावर सर्व पक्षांबरोबर चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानिमित्ताने टीकेचे प्रमुख लक्ष्य राहिलेली सत्तेतील भाजपा, मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्व पक्षांच्या पदरात टाकत टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

राज्यभर गेल्या सहा - सात दिवसांपासून विविध मराठा संघटनांचं आंदोलन सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुंबई बंद आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं. आत्तापर्यंत या आंदोलनात दोघांनी आपला जीव गमवला आहे. जाळपोळ आणि हिंसक घटनांनंतर झोपेतून जाग्या झालेल्या सरकारनं चर्चेचा मार्ग अवलंबवत वेगानं हालचाली सुरू केल्यात. 

मराठा नेत्यांशी चर्चा 
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आणि राज्यभर पेटलेले आंदोलन शांत करण्यासाठी राज्य सरकार आता विविध पर्यायांवर विचार करतंय. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपतींची आंदोलन शमवण्यासाठी मदत घेतली जाणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सरकारच्या सूत्रांकडून माहिती मिळतेय.