सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बिहार पोलिसांना द्यायला कूपर हॉस्पिटलचा नकार

सुशांतसिंग राजपूतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवण्यासाठी सध्या बिहार पोलीस प्रयत्नशील आहेत.

Updated: Aug 1, 2020, 04:54 PM IST
सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बिहार पोलिसांना द्यायला कूपर हॉस्पिटलचा नकार title=

मुंबई : सुशांतसिंग राजपूतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवण्यासाठी सध्या बिहार पोलीस प्रयत्नशील आहेत. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला नाही, म्हणून बिहार पोलिसांनी कूपर हॉस्पिटल गाठलं. कूपर हॉस्पिटलमध्ये बिहार पोलिसांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची मागणी केली आहे. पण कूपर हॉस्पिटलनेही बिहार पोलिसांना रिपोर्ट दिला नाही.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट हवा असल्यास योग्य मार्गाने मागावा, असं कूपर हॉस्पिटलने बिहार पोलिसांना सांगितलं आहे. मुंबई पोलिसांकडून अथवा योग्य मार्गाने हा अहवाल घ्यावा, असं उत्तर कूपर हॉस्पिटलने बिहार पोलिसांना दिलं आहे. त्यामुळे बिहार पोलिसांच्या हाती अजूनही सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. 

सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये त्याच्या आत्महत्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची टीम मुंबईमध्ये आली आहे. बिहार पोलिसही सुशांतच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. आज सकाळी बिहार पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. मुंबई पोलीस सहकार्य करत असल्याचंही बिहार पोलिसांनी सांगितलं.

वांद्रे पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर बिहार पोलीस दिग्दर्शक रुमी जार्फीच्या घरीही गेले. 

सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन कालच मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईच्या रस्त्यावर मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. बिहार पोलिसांचे अधिकारी अंधेरीमध्ये पोलीस उपायुक्तांना भेटायला गेले होते. यानंतर बिहार पोलिसांना मीडियाशी बोलायचं होतं, पण मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना माध्यमांबरोबर बोलू दिलं नाही. तसंच बिहार पोलीस अधिकाऱ्यांना जबरदस्ती गाडीत घालून मुंबई पोलीस घेऊन गेले.