प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : तुम्ही कधी सुट्ट्या पैशांसाठी रिक्षा किंवा टॅक्सी चालकाशी वाद घातलाय का? सुट्टे पैसे हा कळीचा मुद्दा, यावरून भर रस्त्यात धिंगाणा झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. एकीकडे राजकारण्यांच्या (ED) ईडी कारवाईत करोडो रुपयांची उलाढाल समोर येत असतानाच सर्व सामान्य नागरिकाला पाच रुपयांसाठी झगडावे लागत असल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे.
वसईच्या वसंत नगरी सिग्नलवर पाच रुपयांवरून प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर भर रस्त्यातच 15 ते 20 मिनिटे प्रवाशाने धिंगाणा घालून आपले हक्काचे सुट्टे पैसे रिक्षा चालकाला परत करायला लावले.
वसईच्या एव्हरशाईन येथून वसंत नगरी सिग्नल वर एक तरुण रिक्षातून 15 रुपये भाडे निश्चित करून रिक्षात बसला होता मात्र ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रिक्षा चालकाने 20 रुपये घेऊन पाच रुपये देण्यास नकार दिल्याने या ग्राहकाचा संताप अनावर झाला आणि त्याने रस्त्यातच राडा घातला.
आपले उरलेले पैसे पुन्हा मिळविण्यासाठी त्याने रिक्षा चालकाशी जोरदार भांडण केले, तरी रिक्षा चालक उरलेले सुट्टे पैसे देण्यास अडीबाजी करत असल्याने त्याने रिक्षाची चावीचं काढली आणि तो आपल्या वाटेने निघाला.
अखेर रिक्षा चालकाने त्याचा पाठलाग करत भाड्याचे उरलेले पाच रुपये त्याला परत केले. दरम्यान तिथे बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर नागरिकांनी केलेल्या मध्यस्तीनंतर दोघांमध्ये. सुरु असलेले भांडण शांत झाले. वसई विरार परिसरात रिक्षाच्या भाड्यावरून रिक्षा चालकांची मुजोरी सुरु आहे. त्यावर हा तरुण चांगलाच भारी पडलेला पाहायला मिळाला.