'कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीसांना उलट-तपासणीसाठी बोलवा'

लाखे-पाटील यांनी आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र दाखल करत ही मागणी केलीय

Updated: Jan 28, 2020, 02:37 PM IST
'कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीसांना उलट-तपासणीसाठी बोलवा' title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साक्षीदार म्हणून बोलवण्याची मागणी करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे पाटील यांनी कोरेगाव - भीमा चौकशी आयोगाकडे ही मागणी केलीय. आयोगानं माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना साक्षीदार म्हणून बोलावून त्यांची उलट तपासणी घ्यावी, असं संजय लाखे पाटील यांनी म्हटलंय. फडणवीस यांनी याप्रकरणी विधिमंडळात विविध वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांना साक्षीसाठी बोलावण्याची मागणी करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही २०१८ सालीही लाखे-पाटील यांनी हीच मागणी आयोगासमोर केली होती. लाखे-पाटील यांनी आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र दाखल करत ही मागणी केलीय.

दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह चर्चा सुरू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएनं आपल्या ताब्यात घेतलाय. तपासासाठी एनआयएनं पुणे पोलिसांकडे कागदपत्रं मागितली होती. मात्र, ही कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला आहे. केंद्राकडून पत्र आलं तर कायदेशीर बाबी तपासू असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.