दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: कोरेगाव-भीमाची दंगल हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षडयंत्र होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात ही बाब नमूद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता कोरेगाव-भीमा प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोरेगाव-भीमा प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. भाजप सरकारने दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठिशी घालून जनतेची दिशाभूल केली. पोलिसांकडून दंगलीच्या आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी या दंगलीसाठी माओवादी संघटना जबाबदार असल्याचे सांगत अटकसत्र सुरु केले. तत्कालीन सरकारला पुरोगामी आणि लोकशाही आवाज दडपून टाकायचा होता. त्यासाठी सरकारकडून सत्तेचा बेसुमार गैरवापर करण्यात आला. प्रसारमाध्यमांमध्ये गैरप्रचार करून जनतेत संभ्रम आणि संशयाचे धुके निर्माण करण्यात आले. यानंतर पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा आरोपही शरद पवार यांनी पत्रात केला आहे.
फडणवीस सरकारकडून शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप; चौकशीचे आदेश
तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत कोरेगाव-भीमा प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे संकेत दिले. कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या पोलीस चौकशीकडे संशयाने पाहिले जात आहे. आमच्याकडे अशाप्रकारची अनेक निवेदने आली आहेत. भाजप विरोधात कुणीही विचार मांडले तर त्याला अर्बन नक्सल म्हणायचे, अशी फडणवीस सरकारची भूमिका होती. त्यामुळे या सगळ्याची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही यावेळी देशमुख यांनी दिली.