'बेस्ट' संपावर न्यायालयात आज दुपारी सुनावणी

महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय

Updated: Jan 15, 2019, 09:36 AM IST
'बेस्ट' संपावर न्यायालयात आज दुपारी सुनावणी  title=

मुंबई : 'बेस्ट' संपाबाबत उच्च न्यायालयातही तोडगा निघू शकलेला नाही. आजच्या उच्चस्तरीय बैठकीत तोडगा निघाला नाही तर आम्हाला आदेश द्यावे लागतील, असं उच्च न्यायालयानं सोमवारच्या सुनावणीत जाहीर केलंय. त्यामुळे या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज दुपारी ३.०० वाजता या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

कामगार संघटनांनी बैठक घेऊन संपाबाबत निर्णय घ्यावा, असे आदेशही न्यायालयानं दिलेत. 'मेस्मा' अंतर्गत कारवाई केल्यास संप अधिक चिघळेल, असं मत राज्य सरकारनं मांडलं. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला जाईल मात्र आधी संप मागे घ्यावा, असंही सरकारनं म्हटलंय. तर महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय.

बेस्टच्या संपाचा आठवा दिवस

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा आठवा दिवस आहे. परिणामी बेस्टच्या आगारात मागील आठ दिवसांपासून बसगाड्या उभ्याच आहेत. संपामुळे यातील एकही गाडी आगाराबाहेर आलेली नाही. हा संप सुरु असल्यानं गाड्यांच्या देखभालीचा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. शिवाय बेस्ट उपक्रमाचा दिवसाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. 

दरम्यान, बेस्टचा संप सुरु असल्याने एनएमएमटीने मुंबईकडील १४ मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटीकडून या मार्गावर ४० अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. इतर दिवशी मुंबईत एनएमएमटीच्या साधारण ३५० फेऱ्या होतात. मात्र, सध्या एनएमएमटीने ११५ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत या मार्गावरील एनएमएमटीचे उत्त्पन्न पाच ते सहा लाखांनी वाढल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.