चर्चा निष्फळ, 'बेस्ट' कामगारांचा संप कायम

शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेला या बैठकीतून बाहेरच ठेवण्यात आलंय

शुभांगी पालवे | Updated: Jan 9, 2019, 09:05 AM IST
चर्चा निष्फळ, 'बेस्ट' कामगारांचा संप कायम title=
फाईल फोटो

अपडेट सकाळी ०२.१८ : बेस्ट संपाबाबतची बैठक संपली

चर्चा निष्फळ. संप सुरूच राहणार . तीन मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागे घेणार नाही- बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समिती

तोटा असल्याचे दाखवून बेस्टच्या जागा विकण्याचा डाव सत्ताधारी शिवसेनेचा आहे - शशांक राव

अपडेट सकाळी १२.४५ बैठक सुरू

बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी बेस्ट कृती समितीची बेस्ट प्रशासनासोबत तातडीची बैठक सुरु झालीय. मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात ही बैठक सुरू आहे. बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समिती सरचिटणीस शशांक राव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, आयुक्त अजॉय मेहता हे या बैठकीला हजर आहेत. मात्र, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवलीय.

तसंच वादानंतर, शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेला या बैठकीतून बाहेरच ठेवण्यात आलंय.

अपडेट सकाळी १२.३० : बेस्ट संघटनांमधला वाद चव्हाट्यावर

बेस्ट संपाबाबत बैठक सुरु होण्याआधीच आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर दोन वेगवेगळ्या बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये जुंपली. बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कृति समिती या दोन संघटनांमधला वाद चव्हाट्यावर आला. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेना आजच्या संपात सहभागी होणार नाही, असं पत्र यापूर्वीच या संघटनेनं दिलं होतं. मात्र, बैठकीअगोदर अचनक 'आजच्या संपाला आपला नैतिक पाठिंबा आहे' असं सांगत बैठकीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. यावर बेस्ट कृती समितीच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. 'शिवसेनेची कामगार संघटना बैठकीत उपस्थित राहणार असेल तर बैठकीत येणार नाही', अशी भूमिका बेस्ट कृती समितीनं घेतली.

अपडेट सकाळी ११.०० : विद्यार्थ्यांना दिलासा

आज अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा वर्गात उशिरा पोहचल्यास त्याला प्रविष्ठ करुन घेण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्यात. आज कायदा, एम एससी, एम कॉम, एम ए, बी एड, एम एड अशा एकूण १७ परीक्षांचं नियोजन आहे.

महाविद्यालयांना सूचना
महाविद्यालयांना सूचना 

 अपडेट सकाळी १०.३० :  मेट्रोचा ताण वाढला 

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोवर बेस्ट संपामुळे ताण वाढलाय.  पश्चिम उपनगरात जाण्यासाठी प्रवाशांना खरतर बेस्टचा पर्याय असतो मात्र बेस्ट संपामुळे नेहमी प्रवास करणारे प्रवासी मेट्रोकडे वळले. यामुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय... मेट्रो प्रशासनानंही अधिक मेट्रो सोडण्याची तयारी दर्शविली आहे. घाटकोपर मेट्रो स्थानक आहे मध्य रेल्वेशी जोडले गेला असल्यामुळे प्रवाशांसमोर पश्चिम उपनगरात जाण्यासाठी आता हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे प्रवाशांची गर्दी या स्थानकात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतेय . 

अपडेट सकाळी १०.२५ :  सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर परिसराला बेस्ट संपाचा सर्वाधिक फटका बसत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेतून उतरून कामाच्या ठिकाणी, कॉलेजला जाणाऱ्यांची मोठी पंचाईत बेस्ट संपामुळं झालीय. अनेक नागरिकांना तर संपाची काही कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा संप एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

अपडेट सकाळी १०.१५ : ओला-उबेरचा खर्चिक पर्याय
आज बेस्टच्या संपामुळे मुबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. रिक्षा-टॅक्सीचे दर वाढले आहेत. ओला-उबेरचा पर्याय खर्चिक आहे. त्यामुळे अनेकांना पायपीट करत ऑफिसातला जावं लागतंय... तर बाहेर गावातून आलेल्या लोकांना संपाची माहितीच नसल्यामुळे त्यांचेदेखील हाल होत आहेत.   

अपडेट सकाळी १०.००:   मरोळ डेपोमध्ये सकाळपासून एकही बस डेपोतून बाहेर पडलेली नाही. बेस्टच्या संपामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

अपडेट सकाळी ९.४५ : एमएसआरटीसीकडूनही ३७ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या

* कुर्ला ते बीकेसी - ५ अधिक बसेस

* कुर्ला ते माहूल - ४ अधिक बसेस

* दादर ते मंत्रालय - ५ अधिक बसेस

* पनवेल ते मंत्रालय - ५ अधिक बसेस

* सीएसएमटी ते मंत्रालय - ६ अधिक बसेस

* ठाणे ते मंत्रालय - १२ अधिक बसेस

अपडेट सकाळी ९.३० : एसटी मुंबईकरांच्या मदतीला

बेस्ट संपाच्या पाश्वभूमीवर एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावून आलीय. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून ४० अधिक बस सुरू केल्या आहेत. त्यातील 

* कुर्ला पश्चिम ते बांद्रा - ५ अधिक बस 

* कुर्ला पूर्व ते चेंबूर - ५ अधिक बस 

* दादर ते मंत्रालय - ५ अधिक बस 

* पनवेल ते मंत्रालय  - ५ अधिक बस 

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय - ५ अधिक बस 

* ठाणे ते  मंत्रालय - १५ अधिक बस 

अशा एकूण ४० बसेस सध्या वेगवेगळ्या मार्गांवरून धावत आहेत. गरजेनुसार जादा बसेस सोडण्यात येतील, असंही आश्वासन एसटी प्रशासनाकडून देण्यात आलंय.

अपडेट सकाळी ११.०४ : बेस्ट कर्मचारी संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक 

अपडेट सकाळी ९.३० : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीची बेस्ट प्रशासनासोबत मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात बैठक आहे. या बैठकीला बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीचे शशांक राव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे बैठकीला उपस्थित राहणार. 

अपडेट सकाळी ९.१० : रस्त्यावर रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी दिसून येतेय. 'बेस्ट'च्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू झालेत आणि त्याचाच फायदा रिक्षा चालक घेताना दिसत आहेत. ठिकठिकाणी रिक्षा चालक भाडी नाकारतायत तर काही जण प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारत आहेत. रिक्षा चालकांची मनमानी इतकी वाढली आहे की त्यांच्यापुढे वाहतूक पोलीसदेखील हतबल झालेले दिसून येत आहेत. 

अपडेट सकाळी ९.०० :   बेस्ट कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे प्रशासनाला ३ हजार २०० बसेस रद्द कराव्या लागल्यात.

अपडेट सकाळी ८.५० :  'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस डेपो ओसाड पडलेले दिसत आहेत. या संपामुळे खोळंबलेले प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लावताना रस्त्यावर दिसत आहेत.

अपडेट सकाळी ८.४० : बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्यात दुपारी १२ वाजल्यानंतर बैठक आयोजित करण्यात आलीय. बेस्ट अध्यक्ष आशिष चेंबुरकर हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

चर्चा निष्फळ, कर्मचारी संपावर 

बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात झालेल्या बैठकीतील चर्चा ही पूर्णपणे निष्फळ ठरल्यामुळे अखेर बेस्टचे कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. सुमारे ३० हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचं कळत आहे. ज्यामुळे बेस्टच्या जवळपास ३ हजार २०० बस या मुंबईच्या रस्त्यावर धावणार नाहीत परिणामी मुंबईकरांना या संपाचा मोठा फटका बसणार आहे. 

संबंधित संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी एक बैठक बोलावली होती. पण या बैठकीला खुद्द महाव्यवस्थापकांचीच अनुपस्थिती अस्ल्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापकांनी ही बैठक घेतली. पण, अखेर या बैठकीचे समाधानकारक परिणाम मात्र समोर आले नाहीत. 

बेस्ट अर्थसंकल्प हा महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी याशिवाय इतरही प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 

हा संप पाहता २५ लाख प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याचं चिन्हं आहे. पण, त्यासाठी प्रशासनाने नेमकी काय तयारी केली आहे, याची अद्याप माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे टॅक्सी, रेल्वे वाहतुकीवर याचा ताण येण्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू कराव्यात. 

अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी. 

महापालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस मिळावा. 

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी.

'बेस्ट'ची कामगारांना तंबी

'औद्योगिक न्यायालयानं आपल्या ७ जानेवारी २०१९ च्या अंतरिम आदेशात 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली आहे, या आदेशाचा भंग केल्यास तो कोर्टाचा अवमान ठरेल' असा बोर्ड बेस्ट बस डेपोच्या बाहेर लावण्यात आलेला आहे. 

तसंच, हा संप मोडीत काढण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१९ च्या नियमानुसार, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम पुरवित असलेल्या सेवा या आपत्कालीन नियंत्रण अत्यावश्यक असल्यानं सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपास मनाई करण्यात 
आलेली आहे. जे कर्मचारी संपात भाग घेतील ते कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.

मुंबईकरांना दुप्पट मनस्ताप

दरम्यान, देशातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातील व्यापक प्रमाणावर संघटीत झालेले सुमारे २५ कोटी कामगार आज आणि उद्या संपावर आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या देशव्यापी संपाचा निर्णय देशातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना व सर्व उद्योगातील देशपातळीवरील स्वतंत्र संघटनाच्या नवी दिल्ली येथे संयुक्त परिषदेत घेण्यात आला आहे. या रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, पब्लिक सेक्टर, कारखाने, टॅक्सी, रिक्षा, म्युन्सिपल कामगार, फेरीवाले, माथाडी कामगार, अंगणवाडी महिला, या आणि इतर क्षेत्रातील कामगार संघटना आणि कामगार यात सहभागी होणार आहेत.