बेस्टचा संप, मुंबईकरांचे हाल होणार?

बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात संपाच्या पूर्वसंधेला झालेल्या आजच्या बैठकीत झालेली चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. 

Updated: Jan 7, 2019, 10:56 PM IST
बेस्टचा संप, मुंबईकरांचे हाल होणार? title=
संग्रहित छाया

मुंबई : बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात संपाच्या पूर्वसंधेला झालेल्या आजच्या बैठकीत झालेली चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जात आहे संपामुळे बेस्ट बस वाहतुकीवर अवलंबून असलेल्या लाखो मुंबईकरांचे हाल होणार आहेत. नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी करण्याबाबत हा संप पुकारण्यात आला आहे. आज ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा बंद सुरु होणार आहे. त्यामुळे याचा परिमाण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. मात्र, प्रशासनाने काय तयारी केली आहे, याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे टॅक्सी, रेल्वे वाहतुकीवर याचा ताण येणार आहे. अनेक ठिकाणी तोबा गर्दी पाहायला मिळणार आहे.

या संपात बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू करण्यात याव्यात. अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी. महापालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस मिळावा. तसेच बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, या संपाला बेस्ट शिवसेना कामगार संघटनेने पाठिंबा दिला आहे. बेस्ट उपक्रमातील बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून संपाचा निर्धार केला आहे. संपाला कर्मचाऱ्यांनी बहुमताने पाठिंबा दिला. त्यानंतर संघटनेनं संपाची घोषणा केली होती. त्यावर तोडगा निघण्याच्या दृष्टीने शुक्रवारी बेस्ट प्रशासन आणि कृती समितीमध्ये चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान, संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा'ची कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, संघटना संपावर ठाम आहे. बेस्टचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत.