प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : गणपती बाप्पाला मोदक आवडत असले तरी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांचा नैवेद्यही बाप्पाला दाखवला जातो. खवा, मावा, नमकीन पदार्थांनाही सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. पण तुम्ही बाप्पासाठी बाजारातून जी मिठाई आणता, ती खरंच शुद्ध असते का?
या मिठाईत भेसळ तर नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं खास मोहीमच हाती घेतलीय. भेसळ रोखण्यासाठी एफडीएनं मिठाई उत्पादकांना महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्यात.
भेसळ रोखण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
मिठाई किती काळात खाता येईल, याची एक्स्पायरी डेट असावी
परवानाधारक व्यावसायिकांकडूनच दूध, खवा, खाद्यतेल खरेदी करावेत
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा
अन्नपदार्थ स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी साठवावेत
माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ झाकून ठेवावेत
दुकानातील कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, कोरोना लसीकरण करावं, अशा सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.
येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे. मिठाई उत्पादकांनी या नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र ग्राहकांनीही मिठाई किंवा अन्नपदार्थ खरेदी करताना खास सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.