मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आलेय.
गणेशोत्सवाच्या दरम्यान पनवेल ते सावंतवाडीपर्यंत २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बध लागू नसतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत दिली.
गणपती उत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्यादा गाड्या सोडण्यात येतात. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी १६ टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान २३ ऑगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असेल.
दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, मेडिकल ऑक्सिजनआणि भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू नसतील, असे मंत्री रावते यांनी स्पष्ट केले.