मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऑपरेशन झाल्यानंतरचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज मुख्यमंत्र्यानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. हाच व्हिडिओ समोर आला आहे.
विधान भवनाच्या समिती कक्षात ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंही उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव आणि सचिवांनाही या बैठकीला बोलविण्यात आले होते.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दर रोज मुख्यमंत्रांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक होते. या बैठकीत सभागृहात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर काही नवीन निर्णय घेऊन त्याची माहिती दुसऱ्या दिवशी सभागृहात देतात. तसेच, अत्यंत तातडीच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय सभागृहात जाहीर करण्यात येतात.
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही सूचना केल्या. तसेच, यासंदर्भात त्यांनी आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठकही बोलावली असून ते टास्क फोर्सचा सल्ला घेणार आहेत. त्यानंतर राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते फिजिकली फिट आहेत. मात्र काही जण त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवित आहेत, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. मुख्यमंत्री अधिवेशनात आलेच पाहिजे असे बंधनकारक नाही. ते अधिवेशनाच्या शेवटी ही येऊ शकतात. संसद सुरू असताना पीएम येतात का? ते बंधनकारक नाही का ? असा सवालही आव्हाड यांनी यावेळी केला.