मुंबईतल्या ३-४ जागा सोडल्यास काँग्रेसचे डिपॉझिटही जप्त होईल- निरुपम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये दुफळी 

Updated: Oct 4, 2019, 12:58 PM IST
मुंबईतल्या ३-४ जागा सोडल्यास काँग्रेसचे डिपॉझिटही जप्त होईल- निरुपम title=

मुंबई : मुंबईत ३ ते ४ जागांव्यतिरिक्त काँग्रेसला यश मिळणार नसून अनामत रक्कमही जप्त होईल असे विधान मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये दुफळी पाहायला मिळत आहे. सोनिया गांधी यांच्या जवळचे नेते कारस्थान करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या व्यवस्थेत गडबड असून ती सुधारली नाही तर पार्टी संपेल असेही ते म्हणाले. 

वर्सोवा विधानसभा निवडणुकीत आपल्या पसंतीचा उमेदवार उभा करावा यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती. पण त्यांची ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. मी मल्लिकार्जुन खर्गेंकडे गेलो पण ते भेटले नाहीत. असेच होत राहीले तर मी जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाही असे ते म्हणाले. 

मी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार नाही. काँग्रेस कार्यालयात बसून राहुल गांधी यांच्याविरोधातच कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक लढण्याची काँग्रेसची मानसिकता नसल्याचेही निरुपम म्हणाले.