मुंबई : शिवसेनेसोबत असलेली कटुता संपवा, असा सल्ला राणेंना दिला असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करु नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राणेंना केलं. बाळासाहेबांबाबत तुमच्या मनात श्रद्धा आहे, तर मग ही कटुता किती दिवस ठेवणार? ही कटुता संपली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे हे भाजपचे उमेदवार म्हणूनच राज्यसभेवर गेले आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मुलाच्या प्रवेशाचा प्रश्न होता. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना कणकवलीमधून तिकीट मिळालं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्यासाठी प्रचार सभेला जाणार आहे, पण या सभेत शिवसेनेवर टीका करणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री कणकवलीमध्ये प्रचारसभा घेणार नाहीत, असा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला होता, पण मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
आदित्य ठाकरेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनेनं घ्यावा. आदित्य मंत्री झाले तर आनंदच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं. भाजपा आणि शिवसेनेत कसलाच वाद नाही, आमची लढाई शिवसेनेशी नाही, असंही त्यांनी सांगितलं.