'मुंबईतील ड्रग्ज, पब आणि पार्टी कल्चरवर कारवाई करा'

वांद्रे सी लिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात ड्रग्ज नेटवर्क कार्यरत

Updated: Aug 31, 2020, 04:50 PM IST
'मुंबईतील ड्रग्ज, पब आणि पार्टी कल्चरवर कारवाई करा' title=

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या ड्रग्ज, पब आणि पार्टी कल्चरवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहले आहे. या पत्रात आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात मी आपले आज पुन्हा लक्ष वेधत आहे. जे मोठ्या चिंतेचे कारण बनले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. सुशांतसिंग राजपूत या तरुणाचा शोकजनक दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या केसच्या तपासात त्यांच्या मित्रमंडळातील अनियंत्रित अंमली पदार्थांचा वापर केल्याचे मीडियातून समोर येत असल्याने पुन्हा एकदा ड्रग्जचा विषय ऐरणीवर आला आहे. 

गेल्या वर्षात मी या विषयात कडक कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीसांकडे वारंवार विनंती केली होती. मी नुकतीच १४ मार्च २०२० रोजी वांद्रे सी लिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल डिसीपी,अँटी नारकोटिक्स सेलला एक सविस्तर पत्र लिहिले होते. परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. किंवा त्याबाबत मला अवगत करण्यात आले नसल्याचे शेलार यांनी म्हटले. 

ड्रग्जचे सेवन देशातील तरूणांचे आयुष्य उध्वस्त करीत असून मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरूद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तीशी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्र विरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबईवर मुख्य लक्ष्य आहे.

माझ्या वांद्रे, खार, सांताक्रूझ या मतदारसंघ क्षेत्रात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पबपैकी बर्‍याचजणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाईटलाइफ पार्ट्या सुरु असतात. हीच ठिकाणे दुर्दैवाने बेकायदेशीर ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने हे सारे राजरोसपणे सुरु आहे.

१९९०च्या उत्तरार्धात ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड नष्ट केले त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या या सर्व ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. अशा नेटवर्कमधील संबंधीत मालमत्ता जप्त करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

सुशांतसिंग राजपूत यांच्या साथीदारांनी वापरलेल्या बेकायदेशीर ड्रग्ज वांद्रेमधील खालील ठिकाणांहून ड्रग्ज टोळ्यांकडून आणल्या गेल्या असाव्यात, अशीही चर्चा आता कानी पडू लागली आहे. त्यामुळे याचे गांभीर्य आता तरी पोलीस प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. माझ्या मतदारसंघातील बेकायदेशीर अंमली पदार्थांचे अड्डे असलेली खालील ठिकाणे असून स्थानिक वारंवार याबाबत तक्रार करीत आहेत.

* वांद्रे सी लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर, 
* वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुल नगर, नर्गिस दत्त नगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू
* वांद्रे पश्चिम, बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन) अरुण कुमार वैद्य नगर समोर, 
* गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी 
* मुरगन चाळ, सांताक्रूझ पश्चिम
* वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्री नगर
* ओएनजीसी लेन वरीव पब आणि बार, वांद्रे रिक्लेमेशन 

माझ्या मतदार संघातील या परिसरांची नावासहीत माहिती मी वारंवार देऊन कारवाईची मागणी यापूर्वीही केली आहे. तरी कृपया पुन्हा आपल्याला मी विनंती करीत असून वांद्रे पश्चिम परिसरात पोलिसांनी धडक मोहीम राबवून अंमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करावेत. सुशांत सिंह रजपूत प्रमाणे अन्य हजारो तरुणांना या जाळ्यापासून वाचवावे अशी विनंती मी करतो, आशिष शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.