Aryan Khan Drug Case : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान याच्या प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र सध्या समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. सीबीआयने (CBI) वानखेडे यांच्या अटकेवरील स्थगिती उठवण्याची विनंती हायकोर्टाकडे (High Court) केली आहे. त्याविरोधात वानखेडे यांनी याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. दुसरीकडे आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंसोबत अभिनेता शाहरुख खान यालाही आरोपी करण्यात यावे यासाठी एका वकिलाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. सोमवारी ओझा यांनी शाहरुख खान विरोधातील ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेमुळे आता शाहरुख खानच्या पुन्हा एकदा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
"समीर वानखेडे प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अभिनेता शाहरुख खान याने 50 लाख रुपये लाच दिल्याचं म्हटलं आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच मागणारा आणि लाच देणारा हे दोघेही दोषी असतात. शाहरुख खान याने लाच दिली आहे. यामुळे शाहरुखलाही आरोपी करावं," अशी याचिका ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी केली आहे.
एनसीबीचे माझे अधिकारी समीर वानखेडे यांनी 3 ऑक्टोबर 2021 रोजी गोव्याला जाणार्या क्रूझवरुन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आर्यन खान याला आरोपी न बनवण्याच्या बदल्यात 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे सीबीआयने नुकतीच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. तथापि, वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे आदेश दिले होते.
दरम्यान, एसआयटीने गेल्या वर्षी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाला सादर केलेल्या अहवालात प्रामुख्याने 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमविरुद्ध दोन प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली. यात केंद्रीय नागरी सेवा नियमांचे उल्लंघन आणि क्रूझमध्ये ड्रग्ज सापडल्याच्या संदर्भात छापे मारण्याच्या प्रक्रियेतील कथित अनियमितता यांचा समावेश आहे.