मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडेंची चौकशी करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना आज अपयश आलं. दरम्यान, संभाजी भिडे यांना अटक केली तर वातावरण निवळेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. मात्र अटक केली नाही तर २६ मार्चला मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिलाय.
भिडेंची चौकशी करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना आज अपयश आलं. कारण संभाजी भिडे बाहेर गावी असल्यामुळे त्यांची चौकशी झाली नाही. मात्र शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांची दोन तास चौकशी करण्यात आली. दंगलीच्या दिवशी संभाजी भिडे कुठे होते याबाबत चौगुले यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. मात्र या चौकशीबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे.
कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र एकबोटेंना अटक करण्यात आली असून भिडेंवर मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर आता भिडेंच्या चौकशीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.