मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. जमीन गैरव्यवहाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप यात नोंदविण्यात आलाय. हक्कभंग मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितलीय. भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप खडसेंवर आहे. त्यामुळं खडसेंना मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं.
याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी चुकीची माहिती विधानसभेत दिल्याचा दावा खडसेंनी केलाय. उद्योगमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी ९ जुलै २०१७ रोजी हक्कभंगाची नोटीसही दिलीय. ही नोटीस सभागृहात मांडण्याची परवानगी मला द्यावी, अशी मागणी खडसेंनी गुरुवारी केली. नाथाभाऊंनी भ्रष्टाचार केला, असा केवळ ओरडा केला जातो. खरं काय ते लोकांसमोर येऊ दे, असंही ते म्हणाले.