मुंबईकरांना आता कोरोना घाबरणार, उरला फक्त 14 टक्के लोकांना धोका

कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात केलेल्‍या पाचवे सेरो सर्वेक्षणातील निष्‍कर्ष जाहीर

Updated: Sep 17, 2021, 06:06 PM IST
मुंबईकरांना आता कोरोना घाबरणार, उरला फक्त 14 टक्के लोकांना धोका title=

मुंबई : कोविड-19 (covid-19) विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे (Brinmumbai Municipal Corporation) महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण (Sero survey) अर्थात रक्‍त नमुन्‍यांची चाचणी करुन अॅण्‍टीबॉडीज्  (Antibodies) शोधण्‍याबाबतचं सर्वेक्षण करण्‍यात आलं. सर्वेक्षणानुसार, एकूण 86.64 टक्‍के नागरिकांमध्‍ये अॅण्टीबॉडीज् दिसून आले आहेत. कोविड लसीकरण झालेल्‍या नागरिकांपैकी Anitbodies विकसित झालेल्‍यांची संख्‍या 90.26 टक्के तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍ये अॅण्टीबॉडीज् आढळली आहेत. 

विशेष म्‍हणजे, मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसंच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये देखील अॅण्टीबॉडीज् विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे.

दरम्‍यान, अॅण्टीबॉडीज् आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता प्रदान करतील, याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्‍यामुळे नागरिकांनी ढिलाई न करता, कोविड विषाणू संसर्ग होवू नये म्‍हणून मास्‍कचा योग्‍य उपयोग, हातांची नियमित स्‍वच्‍छता, सुरक्षित अंतर इत्‍यादी कोविड अनुरुप वर्तणूकीचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आलं आहे.
 
कोविड-19 विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेणे गरजेचं असतं. याचाच एक भाग असलेल्‍या सेरो सर्वेक्षणामध्‍ये रक्‍त नमुने घेऊन त्‍यातून अॅण्‍टीबॉडीज् अस्‍त‍ित्‍वात आहेत किंवा कसे, याचा अभ्‍यास केला जातो. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्‍ये आतापर्यंत तीनवेळा सेरो चाचणी करण्यात आली आहे. तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्‍यात आले आहे. 

या चार सर्वेक्षणानंतर, कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱया लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर, पुन्‍हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्‍यानुसार, 12 ऑगस्‍ट ते 8 सप्‍टेंबर 2021 या कालावधीमध्‍ये महानगरपालिकेनं पाचवे सेरो सर्वेक्षण राबवलं. त्‍यातील निष्‍कर्ष आता जाहीर करण्‍यात आलं आहे. 

महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्‍य विभाग, शीव इथल्या लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालय यांच्‍या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन तसंच आयडीएफसी इन्‍स्‍ट‍िट्यूट यांच्‍या संयुक्‍त सहकार्याने हे पाचवं सेरो सर्वेक्षण राबविण्‍यात आलं. शास्‍त्रोक्‍तरित्‍या नमुना निवड पद्धतीचा (random sampling) वापर करून, वय वर्ष 18 पेक्षा अधिक असलेल्‍या नागरिकांमध्‍ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. 

महानगरपालिकेचे दवाखाने तसंच खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक यांच्‍याकडे येणाऱया विविध समाज घटकातील रुग्‍णांचा यामध्‍ये समावेश होता. अशा रितीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 प्रशासकीय विभागात मिळून एकूण 8 हजार 674 नागरिकांचं रक्‍त नमुने संकलित करुन त्‍याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांची माहिती नोंदविण्‍यासाठी मोबाईल अॅप्‍लीकेशनचा उपयोग करण्‍यात आला तसेच सर्वेक्षणामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी त्‍यांची संमती देखील घेण्‍यात आली.

पाचव्‍या सेरो सर्वेक्षणातील ठळक निष्‍कर्ष 

- बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील या सर्वेक्षणात केलेल्‍या चाचण्‍यांपैकी एकूण 86.64 टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता अर्थात संबंधित अॅण्टीबॉडीज् (Sero positivity / IgG Antibodies) आहेत. यामध्‍ये झोपडपट्टी परिसरांमध्‍ये सुमारे 87.02 टक्‍के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्‍ये सुमारे 86.22 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड आहेत.

- सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये 85.07 टक्के इतकी तर महिलांमध्ये 88.29 टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली.

- सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांपैकी सुमारे 65 टक्‍के नागरिकांनी कोविड लस घेतली असून उर्वरित 35 टक्‍के नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

- लस घेतलेल्‍या नागरिकांचा विचार करता, सुमारे 90.26 टक्‍के नागरिकांमध्‍ये अॅण्टीबॉडीज् विकसि‍त झालेली आहेत. 

- ज्‍यांनी कोविड लस घेतलेली नाही अशा नागरिकांपैकी सुमारे 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍येही अॅण्टीबॉडीज् विकसित झाल्‍याचे दिसून आले.

- सर्वेक्षणात घेतलेल्‍या नमुन्‍यांपैकी सुमारे 20 टक्‍के हे आरोग्‍य कर्मचाऱयांचे होते. त्‍याचा विचार करता, या गटामध्‍ये अॅण्टीबॉडीज् असण्‍याचे प्रमाण हे 87.14 टक्के इतके आहे.

- विविध वयोगटांचा विचार करता, 80 ते 91 टक्‍के दरम्‍यान सेरो-सकारात्‍मकता / प्रतिपिंड अस्‍त‍ित्‍व आढळून आले आहे.