अंधेरी दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल सुटली

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली

Updated: Jul 3, 2018, 03:04 PM IST
अंधेरी दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल सुटली title=

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी या स्टेशनमधून पहिली लोकल रवाना झालीय. रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावर ही पहिली लोकल रवाना करण्यात आलीय. परंतु, पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र अजूनही ठप्पच आहे. ही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अंधेरीत ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम अद्यापही सुरू आहे. दरम्यान, पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहतूक संथ गतीनं सुरू आहे... तर लिंक रोडवर, एसव्ही रोडवर अजूनही वाहतूक कोंडी दिसून येतेय.  

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली. सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला... आणि एकच गोंधळ उडला.

रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं नोकरदारांनी रस्ते मार्गाचा अवलंबला... एरव्हीही पश्चिम द्रुतगतीमार्गावर वाहतूक कोंडी असताना आज त्यात आणखी भर पडली. नोकरदारांनी कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडला मात्र तिथेही त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय.

पाच जण जखमी

या दुर्घटनेत पाच जण जखमी झालेत. जखमींना जवळच्याच कुपर रुग्णालयात हलवण्यात आलंय.  यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत... द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावं आहेत... तर एक महिला जखमी आहे.