मुंबई : मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली. सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला. आणि एकच गोंधळ उडला. पश्चिम रेल्वेची वाहतूक तेव्हापासूनच ठप्प आहे. ती सुरु होण्यास अजून किमान पास ते सहा तास लागण्याची शक्यताय. तिकडे पूर्व उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानं सायन, माटुंगा, भांडुपच्या सखल भागात पाणी शिरलंय. सायनमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं मध्यरेल्वेच्या लोकल वाहतूकीवरही परिणाम झालाय. दोन्ही रेल्वे मार्गांवर खोळंबा झाल्यानं अर्थातच लोक रस्त्यानं प्रवासाला निघाले... आणि रस्ते वाहतूकीचेही तीन तेरा वाजलेत.
अंधेरीतल्या पूल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वे सेवा वांद्रे ते गोरेगाव स्थानका दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नोकरदारांनी रस्त्याचा मार्ग अवलंबला. एरव्हीही पश्चिम द्रुतगतीमार्गावर वाहतूक कोंडी असताना आज त्यात आणखी भर पडली. नोकरादारांनी कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडला मात्र तिथेही त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय.
पुल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरची दोन्ही बाजूची रेल्वेसेवा अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांना रेल्वे स्थानकातच थांबावं लागतंय. वसई आणि नालासोपारा, बोरिवली रेल्वे स्थानकातली ही दृश्य असून. मुंगीलाही आत शिरायला जागा उरलेली नाही, अशीच रेल्वे स्थानकांची दशा झालीय. कुठचीही अनाऊंसमेंट होत नसल्यामुळे मुंबईकरांना काय करावं याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली असून रेल्वे कधी सुरु होतेय, याच्याच प्रतीक्षेत नोकरदार आहेत.
अंधेरीतील रेल्वे दुर्घटनेमुळं पश्चिम रेल्वेवरच्या वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालीय. अनेक प्रवासी सकाळपासून रेल्वे स्थानकात अडकून पडलेत.
पश्चिम रेल्वे लाईनला पादचारी पूल कोसळल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतेय...अजूनही वांद्रे ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरु झालेली नाही,....त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बेस्टच्या वतीने बस मार्गावर जादा बसगाड्या चालविण्यात येत आहेत. जवळपास बेस्टने २७ जादा बसेस सोडल्या आहेत.
१) बसमार्ग क्र. २०२ -०२
२) बसमार्ग क्र.२२५ -०२
३) बसमार्ग क्र. ३४८ -०१
४) बसमार्ग क्र. ४४० - ०४
५) बसमार्ग क्र. ४ मर्या - ११
६) बसमार्ग क्र. २०३ - ०५