नवनीत राणा यांनी पत्रात लिहिलं, माझ्यासोबत कसा जातियवाद करतायत

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

Updated: Apr 25, 2022, 06:29 PM IST
नवनीत राणा यांनी पत्रात लिहिलं, माझ्यासोबत कसा जातियवाद करतायत title=

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना पोलिसांनी अटक करुन भायखळा आणि तळोजा कारागृहात रवानगी केली. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध या पत्राद्वारे तक्रार केली आहे. खासदार राणांनी या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. (amravati mp navneet rana has lodged a complaint against maharashtra government and police in a letter to loksabha speaker)

काय आहे तक्रार?

"मला 23 एप्रिलला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मी 23 तारखेची रात्र पोलीस ठाण्यात काढली. रात्रभर मी पाणी मागितलं, मात्र मला पिण्यासाठी पाणी देण्यात आलं नाही", अशी तक्रार खासदार राणा यांनी पत्रात केली आहे.

पोलिसांवर आरोप काय?

"पोलसांनी माझ्या जातीचा उल्लेख केला. मी खालच्या जातीची असल्याने मला पोलिसांनी त्या ग्लासात पाणी दिलं नाही, ज्या ग्लासात ते सर्व पाणी पितात. थोडक्यात मला माझ्या जातीमुळे मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलं",असं खासदार राणा यांनी स्पष्ट केलं.

"मला रात्री शौचालयाला जायचं होतं. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या या मागणीकडे ही दुर्लक्ष केलं. मला पोलिसांनी शिवीगाळ केली. तसेच आम्ही खालच्या जीतीतील लोकांना कर्मचाऱ्यांचं शौचालय वापरु देत नाही असेही मला पोलीस म्हणाले", असे गंभीर आरोप नवनीत यांनी लोकसभा अध्यक्षांना केलेल्या तक्रारीत केले आहेत.

"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरकार हिंदुत्वाच्या तत्त्वांपासून पूर्णपणे विचलित झालंय आहे. ज्याच्या जोरावर ते सत्तेत आले ते लोकांच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करत आहेत", असंही राणांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

"मी शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाच्या पठणाची घोषणा केली. माझा कोणाच्याही धार्मिक भावना किंवा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता", असंही खासदार राणा यांनी पत्रात  स्पष्ट केलं. 

दरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी या दाम्प्त्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.