विजेचा धक्का लागला म्हणून भावाला वाचवायला गेला अन् जीव गमावला; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

Ambernath Accident News : अंबरनाथच्या वांगणीमधील ढवळे पाडा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजेचा धक्का लागला म्हणून लहान भाऊ मोठ्या भावाला वाचवायला गेला होता. त्याचवेळी दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

आकाश नेटके | Updated: Jun 25, 2023, 02:07 PM IST
विजेचा धक्का लागला म्हणून भावाला वाचवायला गेला अन् जीव गमावला; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : फार्म हाऊसमध्ये (Farm House) काम करत असताना दोन चुलत भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिसरा भाऊही या घटनेतून थोडक्यात बचावला आहे. अंबरनाथच्या (Ambernath News) वांगणी जवळील ढवळे गावातील एका फार्महाऊसमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोठ्या भावाला वाचवायला गेलेल्या लहान भावालाही विजेचा धक्का लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

वांगणीत फार्म हाऊसमध्ये विजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ढवळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 19 वर्षाचा जयेश बैकर आणि त्याचा 17 वर्षाचा चुलत भाऊ कुमार असे मृत मुलांची नावे आहेत. सुदैवाने त्याचा तिसरा चुलत भाऊ या दुर्घटनेतून बचावला आहे. मात्र जयेश आणि कुमारच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Ambernath Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास जयेश आणि कुमार हे दोघेही फार्म हाऊसमध्ये काही डागडुजीच्या करण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस जयेश हा फॉर्म हाऊस मधील कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासासाठी गेला होता. मात्र त्या दरवाजात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. जयेशला वाचवण्यासाठी कुमारही पुढे गेला मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा झटका इतका तीव्र होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला.

जयेश आणि कुमारला पडलेले पाहून त्या दोघांचा तिसरा चुलत भाऊसुद्धा तिथे आला. त्याने दोघांना वाचवायचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. मात्र त्याला सौम्य धक्का लागल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र जयेश आणि कुमारचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने ढवळे पाडा परिसरात शोककळा पसरली आहे. हा फार्म हाऊस कुमारच्या वडिलांनी चालवायला घेतला होता. त्यामुळे जयेश आणि कुमार तिथे डागडुजीच्या कामासाठी गेले होते. मात्र विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान स्थानिक पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पुण्यात शॉक लागून एकाचा मृत्यू

पुण्यात लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने शॉक बसून त्या जागेवर मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या पश्चात्त दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. कामानिमित्ताने अजयकुमार कोंढवा परिसरातून जात होता. मात्र लोखंडी कंपाऊंडला हात लावताच त्याचा विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये अजयकुमारचा जागीच मृत्यू झाला.