व्हेंटिलेटर धूळ खात पडले असल्याचा आरोप चुकीचा, महानगरपालिकेचा खुलासा

महानगरपालिका प्रशासनाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्यात आला आहे.

Updated: Jul 15, 2020, 06:31 PM IST
व्हेंटिलेटर धूळ खात पडले असल्याचा आरोप चुकीचा, महानगरपालिकेचा खुलासा title=
संग्रहित फोटो

मुंबई : महानगरपालिकेला पीएम केअर फंडातून देण्यात आलेले 400 व्हेंटिलेटर वापरात नसून ते धूळखात पडले आहेत, असा होणारा आरोप चुकीचा असून वस्तुस्थितीला धरुन नसल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून 446 व्हेंटिलेटर पुरवण्यात आले आहेत. हे व्हेंटिलेटर टप्प्या-टप्प्याने मिळाले आहेत. हे व्हेंटिलेटर विविध कोरोना आरोग्य केंद्र भव्य सुविधांना (जम्बो फॅसिलिटी) तसंच प्रमुख महानगरपालिका रुग्णालयं, इतर उपनगरीय रुग्णालयांना वितरित करण्यात आले आहेत. 

व्हेंटिलेटर्स टप्प्या-टप्प्याने मिळत असताना, संबंधित कंपनीच्या तांत्रिक कर्मचारी आणि मनुष्यबळाने, त्यांची जोडणी आणि उभारणी करणं आवश्यक असतं. ती सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. संबंधित कंपन्यांकडून मनुष्यबळ उपलब्ध करुन व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करण्यात येत असून बहुतांश ठिकाणी व्हेंटिलेटर सुरु देखील झाले आहेत. व्हेंटिलेटर कार्यान्वित करताना या व्हेंटिलेटर्सची चाचपणी देखील केली जाते आणि त्यामध्ये कोणतीही तांत्रिक पूर्तता करायची असल्यास ते कामदेखील होत आहे. या सर्व निश्चित पद्धतीनुसार त्याचं कामकाज सुरु आहे. व्हेंटिलेटर्स मिळत असताना त्यांचं संचालन करण्यासाठी प्रशिक्षित आणि वैद्यकीय मनुष्यबळदेखील नेमावं लागतं. हे सर्व काम योग्यरितीने होत असताना व्हेंटिलेटर्स धूळखात पडली असल्याचा आरोप हा निराधार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

तसंच, कोरोनाबाबत महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना यश येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असून, रुग्ण बरे होऊन घरी जाण्याची संख्या 70 टक्के इतकी झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने विविध रुग्णालयं, कोरोना आरोग्य केंद्रांमधी बेड रिक्त आहेत. महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या 1053 व्हेंटिलेटर्सपैकी 125 व्हेंटिलेटरवर रुग्ण नसल्याने रिक्त आहेत. नव्याने मिळालेल्या व्हेंटिलेटर्सवर रुग्ण दिसत नाही, याचा अर्थ ते धूळखात पडले आहेत, असं म्हणणं योग्य ठरणार नसल्याचं महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे. तसंच रुग्ण संख्या कमी होणं हे मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत असल्याचं निदर्शक असल्याची प्रशासनाची भावना आहे. यामुळे व्हेंटिलेटर्स धूळखात पडल्याच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्‍य नसून आरोप फेटाळत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.