पुणे : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून (Maharashtra Rain Update) जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे विविध भागात पूरसदृश परिस्थिती ओढावली आहे. गडचिरोलीत तर पावसामुळे 50 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. पावसाचा वाढता धोका पाहता प्रशासन सज्ज झालंय. विविध जिल्यांमध्ये खबरदारी म्हणून आधीच एनडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. (all schools in vasai new mumbai pune and pimpri chinchwad will be closed on July 14 tomorrow due to heavy rain prediction)
राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस बरसतोय. विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उद्या (14 जुलै) शाळा बंद असणार आहेत. यामध्ये पालिका आणि खासगी शाळांचा समावेश आहे. पुण्यात या पावसामुळे आजही शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
वसई, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा या उद्या बंद राहणार आहे. शासनाने शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. महापालिका प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पुण्यातील शाळांना आज (13 जुलै) सुट्टी देण्याबाबतचे आदेश दुपारी काढण्यात आले. त्यामुळे दुपार सत्रात शाळा असणाऱ्या विद्यार्थ्यांना भर पावसात घरी परतावं लागलं. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
प्रशासनला आणि संबंधित विभागाला आज सुट्टीचे देण्याचे आदेश द्यायचे होते, तर किमान हा निर्णय एक दिवसआधी घ्यायला हवा होता, अशी संतप्त भावना पालकवर्गाकडून व्यक्त करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि विद्यालयांना गुरुवारी 14 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अतिवृष्टीची परिस्थिती यापुढेही अशीच राहिल्यास शाळेस सुट्टी घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली.