बँकांचा तीन दिवस होणार संप टळला

बँकांचा संप टळला आहे. वेतवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

Updated: Feb 29, 2020, 08:45 PM IST
बँकांचा तीन दिवस होणार संप टळला title=
संग्रहित छाया

मुंबई : बँकांचा होणार संप (Bank Strike) टळला आहे. मार्च महिन्यात तीन दिवस संप पुकारण्यात आला होता. सुट्टीला लागून हा संप असल्याने सहा दिवस बँक व्यवहार बंद राहणार होते. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला असता. हा संप ११ ते १३ मार्च या दरम्यान वेतवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. वेतनवाढीबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याने संप स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने (All India Bank Employees Association) दिली.

शनिवार, रविवार आणि होळी अशा तीन दिवस सलग सुट्ट्या होत्या. त्यानंतर पुढे तीन दिवस संप होणार होता. त्यामुळे ऐन सणात अनेकांची गैरसोय होणार होती. दरम्यान, आज मुंबईत बँक कमर्चाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांबाबत इंडियन बँक असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तीन दिवसांचा संप स्थगित केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा देण्यात आला आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा  तीन दिवसांचा प्रस्तावित संप स्थगित केल्याची घोषणा इंडियन बँक असोसिएशननेचे महासचिव सी. एच वेंकटचेलम यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी ८ जानेवारीच्या भारत बंदमध्ये बँक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कमर्चाऱ्यांनी संप केला होता. मात्र त्याला केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा एकदा कर्मचारी संघटनांनी  तीन दिवस संपाची तयारी केली होती.