Maharashtra Government Crisis: शिवसेनेतील अंतर्गत बंडालीनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जोर बैठका सुरु आहेत. सरकार वाचवायचं कसं? यावर खलबतं सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या विधीमंडळ आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिक स्पष्ट केली.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. सरकार टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. मी निधी वाटपात कधीही दुजाभाव केलेला नाही.", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. या राजकीय घडामोडींमागे भाजपाचा हात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, "अजूनतरी भाजपाचा या घडामोडीत हात असल्याचं दिसत नाही. भाजपाचा मोठा चेहरा तिथे येऊन काय करतोय असं दिसत नाही. ही वस्तूस्थिती आहे."
सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचाली
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे गटाचे 50 आमदार आणि भाजप यांची युती होऊन राज्यात नवे सत्तासमीकरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडूनही एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. तसेच 12 मंत्री होऊ शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करुन राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत.