बंडखोरी नाट्यानंतरही... अजित पवार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर हे सरकार ठाकरे-पवार सरकार म्हणून ओळखलं जाईल

Updated: Dec 19, 2019, 08:56 PM IST
बंडखोरी नाट्यानंतरही... अजित पवार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ title=

मुंबई : २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा अजितदादाच दिसण्याची शक्यता आहे. 'मी अजित पवार शपथ घेतो की...' असं वाक्य पुन्हा एकदा काही दिवसांत तुमच्या कानी पडण्याची चिन्हं आहेत. फरक इतकाच की आता ते भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारचे नाही तर महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अजित पवार फार काळ सरकारबाहेर राहिले तर ते महाविकास आघाडीलाच धोक्याचं ठरु शकतं, हे एव्हाना शिवसेना आणि काँग्रेसलाही उमगलंय. 

सरकारच्या स्थैर्याचा प्रश्न असल्यानं अजित पवार सरकारबाहेर नको तर सरकार टिकवण्यासाठी अजित पवार मंत्रिमंडळात हवेत आणि सरकार चालवण्यासाठी ते उपमुख्यमंत्री व्हायला हवेत... अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर हे सरकार ठाकरे-पवार सरकार म्हणून ओळखलं जाईल.

अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. अजित पवारांचा सगळ्या विभागांशी दांडगा संपर्क आहे. याआधी दोन वेळा उपमुख्यमंत्री असल्यानं सरकार कसं चालवायचं याचा अजितदादांचा अनुभव तगडा आहे.

काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री असलेले एक किंवा दोघांचा मंत्रिमंडळात समावेष होणार आहे, त्यामुळे वरचढ नेता राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदी द्यावाच लागेल. 

Image result for dcm ajit pawar"
फाईल फोटो : काही दिवसांपुूर्वी फडणवीस सरकारसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अजित पवार

अजित पवार भाजपच्या संपर्कात राहायला नको असतील तर त्यांना मनासारखं पद देण्याशिवाय महाविकास आघाडीकडे दुसरा पर्याय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात अजित पवार त्यांचं बंड सोडून परत आले, त्यामुळेच हे सरकार येऊ शकलं, ही वस्तुस्थिती आहे.

नागपूर अधिवेशनात देवगिरीवर वास्तव्य करुन शरद पवारांनी उपमुख्यमंत्रिपदावर काहीही न बोलताच 'हक्क' सांगितला होता. आता पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित आहे.