मुंबईत शिवसेना नेत्यावर गोळीबार, कारण समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल

हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला

Updated: Dec 19, 2019, 08:00 PM IST
मुंबईत शिवसेना नेत्यावर गोळीबार, कारण समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल title=

अमोल पेडणेकर, झी २४ तास, मुंबई : मुंबईत विक्रोळीमध्ये सकाळ उजाडली तीच एका भयंकर घटनेनं... शिवसेना उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर भर पहाटे मंदिरामध्ये गोळीबार झाला. विक्रोळीच्या टागोर नगर परिसर हादरला तो शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधवांवर झालेल्या गोळीबारानं... चंद्रशेखर जाधव त्यांच्या मुलासह साईनाथ मंदिरात असलेल्या कार्यालयात बसले होते. त्याच वेळी अभय सिंगनं मंदिरात येऊन बेछूट गोळीबार केला. चंद्रशेखर जाधव यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले, असं प्रत्यक्षदर्शी मंदिराचे पुजारी विद्याधर शेंबेकर यांनी सांगितलं. 

(मोठी बातमी: विक्रोळीत शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखावर गोळीबार)

चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार केल्यानंतर अभय सिंगनं पळून जात असताना पाच राऊंड फायर केले. अभय पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला.  

विक्रोळी पोलिसांनी अभयसिंगला अटक केलीय. विक्रोळीमध्ये रियल इस्टेट प्रोजेक्टची कंत्राटं मिळवण्याच्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी व्यक्त केलीय.

नागपूरात महापौरांवर गोळीबार, त्यापाठोपाठ विक्रोळीत शिवसेना उपविभाग प्रमुखावर गोळीबार या हादरवणाऱ्या घटना आहेत... या सगळ्यालाच लवकर वचक बसायला हवा.