AI Airport Services Limited Company Notice: दसरा झाला आणि आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीत कंपन्यांमध्ये बोनस जाहीर केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. कारण येथील कामगारांच्या पगारातून अवाढव्या रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या प्रकाराविरुद्ध आवाज उठवलाय.
एअरपोर्टवरील कामगारांचे पगारातून पैसे कापले जाणार आहे. यासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली आहे. कामगारांच्या गणवेशासाठी ही रक्कम कापली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गणवेशासाठी अनामत रक्कम म्हणून पाचशे,हजार रुपये नव्हे तर तब्बल 15 हजार ते 22 हजार रुपयांपर्यंतची रक्कम कापली जाणार आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील परिपत्रक पाठवले आहे.
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्यवस्थापनाने नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले. या परिपत्रकावर सर्व स्तरातून टिका होतेय. यात कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यासाठी पगारातून अनामत रक्कम घेण्यात येणार असल्याचे म्हटलंय. ऐन दिवाळीच्या तोंडावर 22 हजार रुपयांपर्यंतची मोठी रक्कम गणवेशाच्या नावाखाली डेबिट होणार असल्याचे समजताच कर्मचारीदेखील गोंधळून गेले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या कर्मचारी संघटनेने या घोषणेविरोधात आवाज उठवला आहे. हा प्रस्ताव मागे घेऊन कर्मचाऱ्यांना कंपनीने मोफत गणवेश द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू ठाकरे घटकडून आक्रमक भूमिका पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसकडून कोणीही युनिफॉर्म घेऊ नये असे आवाहन ठाकरे गटाकडून एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. संबंधित कंपनीने हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केली आहे.