मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईमध्ये (Mumbai) नेत्र संसर्गाचे (डोळे येणे/conjunctivitis) रुग्ण वाढत आहेत. महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये गत 15 दिवसांत सुमारे 250 ते 300 नेत्र संसर्ग बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्रास जाणवल्यास तातडीने नेत्र तज्ञांकडून (Ophthalmologist) सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केलं आहे.
मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी वर्षा रोकडे यांनी नेत्र संसर्गाच्या लक्षणाची माहिती देताना सांगितलं की, पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढला की वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरते. त्यामुळे दरवर्षी या दिवसात इतर आजारांबरोबर नेत्र संसर्ग अर्थात डोळे येण्याची साथ पसरते. नेत्र संसर्गाच्या साथीमध्ये सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो, त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील संसर्ग होतो. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटतं आणि सतत डोळ्यांमधून पाणी देखील येतं. डोळे लाल होतात.
सुरुवातीला ही लक्षणे एका डोळ्यास जाणवतात आणि त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील जाणवतात. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेरील बाजूस येत असतो. तसेच डोळ्यांना आतील बाजूस सूज येते. डोळ्यांना खाज येते. डोळे जड वाटतात आणि तीव्र प्रकाश सहन होत नाही. या प्रकारच्या संसर्गामुळे काही लोकांना ताप देखील येतो. सध्या या साथीचे कारण विषाणूजन्य आहे, असे आढळून येत आहे
दरम्यान, नेत्र संसर्ग बाधित रुग्ण आढळून लागल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईतील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. डोळे आले असतील अशा वेळी डोळ्यांना सतत हात लावू नये. तसंच डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुत रहावे. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये. कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे / सुरक्षित अंतर राखून रहावे. तसंच कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ञांचा / नेत्र उपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा.
त्यांच्या सल्ल्यानेच उपचार आणि औषधी घ्याव्यात. योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर 5 ते 6 दिवसांत डोळे बरे होतात. एकदा डोळे येऊन गेले की, परत त्या व्यक्तीला संसर्ग होत नाही, असे नाही. एकदा नेत्र संसर्ग होवून बरे होवूनही पुन्हा त्या व्यक्तीस संसर्ग होवू शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा करणे योग्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य निदान आणि उपचार पुरवले जातात. नेत्र संसर्ग प्राथमिक लक्षणे जाणवू लागतात तातडीने उपचार करून घ्यावेत, असे नम्र आवाहन पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.