'काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता'

कोरोना बाधितांचे आकडे दररोज वाढत असल्याने, मुंबई आणि पुणे शहरातून काही दिवस

Updated: Mar 21, 2020, 10:56 PM IST
'काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता' title=

मुंबई : पुण्यामुंबईतील चाकरमान्यांनी घरची वाट धरल्याने या शहरातील रेल्वे स्टेशन्स आणि बस स्थानकांवर गर्दी झाली आहे. यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची विनंती करण्याची मागणी राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

कोरोना बाधितांचे आकडे दररोज वाढत असल्याने, मुंबई आणि पुणे शहरातून काही दिवस आपल्या मूळगावी जाण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

अर्थातच मुंबई पुण्याहून येणारे लोक कोरोना बाधित आहेत असं नाही. पण यातील काहींना जर प्रवास करण्यास मज्जाव केला असेल, होम कोरंटाईन केलं असेल, तर त्यांनी आहेत त्या जागी थांबणेच योग्य ठरणार आहे.

पुण्यामुंबईची गर्दी गावाकडे गेल्यास या आजाराचा फैलाव होण्यास मदत होणार नाही. कारण परिस्थिती बिघडण्याआधीच लोक गावी गेल्यास मुंबई पुण्याच्या लोकसंख्येचं घनत्व नक्कीच कमी होईल.

लोकसंख्येचं घनत्व शहरांचं कमी झाल्यास रोगाचं फैलाव वेगाने होत नाही. मुंबई आणि पुण्याच्या बाबतीत लोकसंख्या हीच मोठी भीती आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही, ते गावी निघून गेल्याने शहरातील गर्दी नक्कीच कमी होणार आहे.

गावाकडे चला, हे शब्द आज पुन्हा कानी पडायला लागले आहेत, रेल्वे स्टेशन्सवरची गर्दी, बसमधील गर्दीचा सामना करत लोक घरी पोहोचत आहेत.

कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे, हे सर्व होत आहे. काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता...