नवी दिल्ली : अलाहबादचे प्रयागराज आणि फैजाबादचं अयोध्या असं नामकरण झाल्यानंतर आता ऐतिहासिक आग्रा शहराचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय. आग्राचं नाव आता अग्रवन करा अशी मागणी भाजपा आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी केलीय. यासाठी गर्ग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तसं पत्रच लिहलंय.
'एकेकाळी आग्रा इथं मोठ्या प्रमाणावर जंगल होतं. हे वनांचं शहर होतं. तसंच, महाराजा अग्रसेन यांना मानणारा अग्रवाल समाज इथं मोठ्या संख्येनं होता. पूर्वी हे शहर अग्रवन म्हणूनच ओळखलं जायचं. महाभारतातही तसा उल्लेख आहे. मात्र कालांतरानं याचं नाव अकबराबाद आणि नंतर आग्रा झालं.
आता या नावाला काहीही अर्थ नसल्याचं सांगत ते बदलण्यात यावं', असं गर्ग यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.
यासाठी ते लवकर योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत. अग्रसेन महाराजांचा अनुयायी असलेला वैश्य समाज आग्र्यात मोठ्या प्रमाणात आहे.
त्यांची संख्या १० लाखांच्या आसपास आहे. शहरात अग्रवाल समाजाचे लोकही मोठ्या संख्येनं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.