प्रिया दत्त यांच्या मतदारसंघावर अभिनेत्री नगमाचा दावा

प्रिया दत्त यांच्या जागी काँग्रेस सेलिब्रिटीला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार

Updated: Jan 23, 2019, 05:14 PM IST
प्रिया दत्त यांच्या मतदारसंघावर अभिनेत्री नगमाचा दावा title=

मुंबई : लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रिया दत्त यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या जागेवर अभिनेत्री नगमानं दावा ठोकला आहे. वांद्र्यातच आपण वाढलो आणि शिकलो आहोत. त्यामुळे या जागेवर आपला पहिला हक्क असल्याचं वक्तव्य नगमानं केलं आहे. मात्र या जागेवर कृपाशंकर सिंह देखील निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. नगमा यांनी २०१४ मध्ये मध्य प्रदेशातून निवडणूक लढवली होती.

रिपोर्टनुसार प्रिया दत्त या काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवर नाराज होत्या. त्यामुळे त्याने लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय़ घेतला. याआधी देखील प्रिया दत्त यांना पक्षातील अंतर्गत वादावर टीका केली आहे. २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर प्रिया दत्त यांनी टीका केली होती. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देखील पक्षातील नेत्यांवर प्रिया दत्त यांनी नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांच्याकडे निवडणुकीचा अनुभव कमी असल्याचं देखील याआधी त्यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसने सप्टेंबर २०१८ ला प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सचिव पदावरुन मुक्त केलं होतं. प्रिया दत्त यांच्या मतदारसंघात काँग्रेस एखाद्या सेलिब्रिटीला तिकीट देऊ शकते. काँग्रेसकडून नगमा, राज बब्‍बर किंवा आणखी काही सिनेकलाकारांना संधी देऊ शकते.