मुंबई : दिवा रेल्वे स्थानक परिसराला कित्येक वर्षांपासून पडलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा गराडा, ठाणे महापालिका आयुक्तांनी अखेर हटवला आहे. अनेक वर्षांपासून या परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाईच झाली नव्हती. मात्र ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सलग तीन दिवस कारवाई करुन हा परिसर फेरीवाला मुक्त केला.
या कारवाई वेळी जवळपास शेकडो हातगाड्या तोडून फेरीवाल्यांवर कारवाई केली गेली. तसंच याच परिसरातील अवैध पार्कींग करणा-या गाड्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईकरता स्थानिक तसंच प्रवाशांनी ठाणे महापालिका आयुक्तांचे आभार मानले आहेत. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानक परिसर खूप वर्षानंतर मोकळा श्वास घेत आहे.
ठाण्यातील दिवा म्हटलं की समस्यांचे भांडार असेच म्हटले जाते. त्यात प्रामुख्याने दिव्यातील स्टेशन परिसरातील फेरीवाले आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे दिवावासिय हैराण आहेत. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर ठाणे पालिका आयुक्तांनी कारवाई केली. त्याच प्रमाणे आता स्टेशन परिसर खड्डेमुक्त करावा अशी मागणी दिवावासिय आता करू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या खड्ड्यांमुळे स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. इथल्या रस्त्यांची अक्षरक्षा चाळण झाली आहे. तर, या खड्ड्यांमुळे जास्त त्रास हा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सहन करावा लागतोय. त्यामुळे आता हा परिसर खड्डेमुक्त करावा अशी मागणी स्थानिकांसह उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केली आहे.