औरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा झटका; नाराज अब्दुल सत्तार अपक्ष लढणार

मराठवाड्यातील काँग्रेसचा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे.

Updated: Mar 23, 2019, 12:53 PM IST
औरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा झटका; नाराज अब्दुल सत्तार अपक्ष लढणार title=

मुंबई: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी शनिवारी 'झी २४ तास'शी संवाद साधताना आपण औरंगाबादमधून अपक्ष लढणार असल्याचे सांगितले. काँग्रेसने सत्तार यांची सूचना डावलून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार सत्तार यांनी औरंगाबाद किंवा जालन्यातून निवडणूक लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र, हा निर्णय घेताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. आता मी पक्षाकडे नव्हे तर जनतेसमोर न्याय मागणार आहे. मी हाडाचा कार्यकर्ता असल्यामुळे निवडणूक लढवणे माझ्यासाठी फार अवघड गोष्ट नाही. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढवणारच, असे सत्तार यांनी ठणकावून सांगितले.

सत्तार यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमध्ये काँग्रेसपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. अब्दुल सत्तार गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत. याशिवाय, पक्षसंघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात स्वत:चा वचक निर्माण केला आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही अब्दुल सत्तार निवडून आले होते. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. तेव्हादेखील काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल साडेतीन लाख मते पडली होती. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास मतविभाजन होऊन काँग्रेसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून शनिवारी लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधून सुभाष झांबड, जालन्यातून विलास औताडे, चंद्रपूरमधून विनायक बांगडे, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजते.