मुंबई: राज्यातील राजकारण आता शिगेला पोहोचलं आहे. आता वाद ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाला आहे. बंडखोर शिंदेविरोधात युवा सेना अध्यक्ष आणि मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन फसवणूक केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा देखील दिला. तसेच या बंडखोर आमदारांना काय कमी केलं होतं की त्यांनी खोटारडेपणा केला, असा निशाणाही साधला.
"त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा फायदा घेतला आहे. मी त्यांच्या वेदना बघितल्या आहेत. या लोकांनी या प्रसंगाचा फायदा उचलला. जर तुम्ही स्वत:ला बाळासाहेबांचे शिवसैनिक समजत असाल तर या ना समोर आणि सांगा कुठे चूक केली आहे.", असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
"मला दिलवाले दुल्हनिया चित्रपटाचा डायलॉग आठवतो, हम शरिफ क्या हुए, पुरी दुनिया बदमाश हो गई! आहोत आपण दिलवाले . पण त्यांचा खोटारडेपणा आम्ही सहन करणार नाही. खोटारडेपणाची चिरफाड करण्यासाठी मी निघालोच आहे. तुम्ही पण रस्त्यावर उतरून प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्या खोटारडेपणाची चिरफाड केली पाहीजे.", असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. "त्यांना आपण काय कमी दिलं. त्यांना पक्षात आपण इतकं मोठं स्थान दिलं. लायकी तर दिसूनच आलेली आहे. त्यांनी कोणत्या प्रसंगाचा फायदा उचलला आहे. कोविड असताना त्यांनी हे सगळं केलं. मुख्यमंत्र्यांनी नगरविकाससारखं मोठं पद दिलं होतं.", असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी साधला.
"बंड करण्यासाठी कुठे गेलात सूरतेमध्ये तेथून दोन शूरवीर परत आले. नंतर गुवाहटीत गेले. हिंमत असेल तर समोर येऊन बोला. हिंमत असती तर मुंबईतच राहिला असतात.", असं टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सोडलं.